Skip to content

आर्किटेक्चर आणि अर्थशास्त्र 

प्रतीक धानमेर, design जत्रा

 

‘अर्थशास्त्र’ हे मानवाने विकसित केलेले असे एक शास्त्र  आहे ज्यामध्ये नैसर्गिक परीसंस्था आणि इतर प्राणी सहभाग घेऊ शकत नाहीत. मानवाने शेती करायला सुरुवात केली आणि गरजेपेक्षा अधिक निघणाऱ्या उत्पन्नापासून ‘देवाण-घेवाण’ पद्धतीची सुरुवात झाली. ह्यातून मानव समाजशील प्राणी बनत गेला. पुढे हीच देवाणघेवाण पद्धत आजच्या अर्थशास्त्रात बदलली गेली. मुळातच ‘ताकद’ किवा ‘शक्ती’ केंद्रित असलेली ही अर्थव्यवस्था मानवाच्या आणि निसर्गाच्या सर्वांगीण विकासापेक्षा भौतिक आणि विषयसुखावरच आधारलेली आहे. माणसाने स्वतःच्या दैनंदिन गरजा भागवताना येणाऱ्या अडचणी आणि तंटे सोडवण्यासाठी जरी ह्या शास्त्राला जन्म दिला असला तरी इतिहासातील सर्वच युद्धांचा अर्थशास्त्राशी थेट संबंध आहे.

 

चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक प्रख्यात अर्थ तज्ञ. आजही बरेच अर्थ तज्ञ चाणक्यनीती मधून धडे घेताना दिसून येतात. चाणक्यांनी अर्थशास्त्राला नितीमत्तेची जोड देऊन सामाजिक स्तरावर आर्थिक समता आणण्याचा खूप प्रयत्न केला. चाणक्यांनी अर्थशात्राची केलेली व्याख्या खालील प्रमाणे-

 

‘’ जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नाच्या व्यवस्थापनाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र’’

 

आजच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येपेक्षा ही व्याख्या पराकोटीची सोपी आणि सुटसुटीत आहे. चाणक्यांनी ह्या व्याख्येत नैसर्गिक संपदेला अनन्य साधारण महत्व दिले. मनुष्य संपत्ती निर्माण करू शकत नाही. संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य निसर्गातच आहे आणि माणूस फक्त त्याचा उपभोग घेऊ शकतो किवा व्यवस्थापन करू शकतो अशी अप्रत्यक्ष चपराक त्यांनी आपल्याला लगावली होती. परंतु या नैसर्गिक संबंधांचा आपल्याला विसर पडू लागला आणि अर्थशास्त्रातील आकड्यांशी माणसाचा प्रणय सुरु झाला. हळूहळू मानवाच्या मुलभूत गरजांना ह्या अर्थशास्त्राने कधी सामावून घेतले कळलेच नाही.

 

अन्न, वस्त्र, निवारा या मानवी मुलभूत गरजांपैकी ‘निवारा’ गरजेशी आर्किटेक्चर शाखेचा घनिष्ठ संबंध आहे. शेती करण्याअगोदर माणूस निवारा बांधायला शिकला. दगड मातीने सुरु झालेला हा बांधकामाचा प्रवास आज गगनचुंबी इमारतीपर्यंत व्यापक झालाय. अर्थशात्राच्या होणाऱ्या प्रगतीचा आलेख जितका उंच तितकी इमारत सुद्धा उंच. शहरांचा विकास होतो आहे. स्मार्ट शहरांच्या संकल्पनांना भरभरून प्रतिसाद मिळतोय. भारतीय शहरे पाश्चात्य शहरांशी स्पर्धा करू लागलेत. आर्थिक विकासचा दर वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत. ह्या सगळ्याचा आपल्या वैयक्तिक जीवनावर होणारा परिणाम काय ? हा प्रश्न कधी आपल्याला पडला का ?

 

आर्किटेक्चरच्या महाविद्यालयात शिकवताना आपल्या ग्रामीण वास्तुकलेविषयी विद्यार्थ्यांना असलेली उदासीनता प्रकर्षाने जाणवते. कदाचित ह्या विषयाकडे लक्ष द्यायला आपल्या शिक्षणाने त्यांना भाग पाडले नसावे; म्हणूनही असेल कदाचित. पण बांधकाम सौंदर्यपूर्ण करून जबाबदारी संपवणारे आपले वास्तुकलेचे शिक्षण नैसर्गिक परीसंस्थेचा विसर पडण्यास भाग पाडते. विकास हा फक्त आर्थिक असतो असा समज झालेले शहरी चष्मा लावलेले अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण भागाची सुबत्ता फक्त आर्थिकदृष्ट्या बघतात. मग नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास लक्षात न घेता; अंतिम वर्षाचा प्रबंध लिहिताना ग्रामविकासासाठी ‘पर्यटन’ (टूरीझम) आणि ‘सांस्कृतिक कला केंद्र’(कल्चरल सेंटर) या पलीकडे त्यांचे विषय जात नाहीत. अश्या किती सांस्कृतिक कला केंद्रांनी कश्याप्रकारे गावांचा विकास केला? ह्याची साधी कल्पना नसताना, कागदावर चांगला दिसेल असा विषय घेऊन तो विषय तसाच बंद होऊन जातो.

 

भारतात अजूनही ६० टक्क्यापेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात राहतात. भारताला निसर्गाचे अलौकिक वरदान आहे. आपल्या देशात २० हजारापेक्षा जास्त नैसर्गिक सामुग्रीने बांधकाम करण्याच्या पद्धती अस्तित्वात आहेत. प्रत्येक पद्धत आजूबाजूच्या वातावरणाशी योग्य संतुलन साधते. स्थानिक सामुग्री वापरून बांधकाम केल्याने इतर भूभागावर त्याचा ताण येत नही. स्थानिक सामुग्री हि स्थानिक वातावरणाला योग्य प्रतिसाद देते. स्थानिक सामुग्रीने बांधलेल्या घरांना कमी उर्जा लागते, तसेच घराचे तापमान नियंत्रित करण्याची गरज पडत नाही. स्थानिक बांधकामाचे स्थानिक लोकांना योग्य ज्ञान असते. हे ज्ञान हजारो वर्षांच्या परंपरेतून आणि मार्गदर्शनातून विकसित झालेले असते. अश्या घरांच्या बांधकामामुळे गावातील पैसा गावाबाहेर जात नाही. साहित्य जवळपास असल्याने त्याचा वाहतुकीचा खर्च प्रचंड प्रमाणात कमी होतो. त्यामुळे एकूण बांधकामाचा खर्च कमी होतो. तसेच भविष्यात घराच्या दुरुस्तीचा खर्च सुद्धा प्रचंड कमी होतो. माझ्या गावात पूर्वी एक पद्धत होती. गावात जर कोण्या एका व्यक्तीचे घर बांधायचे असेल तर गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती त्या बांधकामाला हातभार लावायला येत असे. तसेच ज्याला मदत मिळत आहे तो सुद्धा इतरांना मदत करण्यासाठी बांधील असे. (आपण लग्नात ज्याप्रमाणे आहेर देतो अगदी तशीच रचना). ह्यामुळे बांधकामाच्या मजुरीचा खर्च जवळजवळ शून्य. ह्या अर्थ व्यवस्थेला ‘गिफ्ट इकोनोमी’ असे छान नाव आहे. याच गिफ्ट इकोनोमी मुळे गावातील समाज एकमेकांशी बांधील राहायचा. ह्यामुळे गावात आर्थिक विषमता नसायची. तसेच समाजाला आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची जोपासना करावी लागायची. आजही भारतातील अनेक आदीवासी गावात अश्या रचना तुम्हाला पाहायला मिळतील. एक वास्तुविशारद म्हणून कधी आपण ह्या सुंदर समाजशील रचनांचा विचार केला का?

 

सध्या आधुनिकतेच्या लाटेमध्ये भारतातील सर्वच जनतेला विकासाची स्वप्न पडू लागली आहेत. पण खरी मेख इथे आहे कि कोणालाही विकासाची स्पष्ट व्याख्या माहित नाही. रस्ते बनले, नद्या जोडल्या, उद्योगधंदे वाढले कि आपल्याला विकास दिसतो. जी. डी. पी. वाढवण्यासाठी अनेक मार्ग शोधले जात आहेत. मुळात केवळ उत्पादनाशी सलंग्न असलेल्या जी. डी. पी. (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) मध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक समाधानाला किंमत शून्य आहे. उलट आपले समाधान देशाच्या आर्थिक विकासासाठी घातक आहे. आपण जितकी उत्पादने विकत घेतो तितकीच देशाची जी. डी. पी. वाढते. आणि उत्पादने विकत घेण्यासाठी आपण असमाधानी असणे आवश्यक असते. इथे मला एक प्रसंग आठवतो. गावात जेव्हा आम्ही काम करण्यास सुरुवात केली तेव्हा अमेरिकेची एक वास्तुविशारद आमच्याबरोबर काम करत होती. एकदा रात्री जेवताना समोर दूरदर्शन चालू होता. त्यावर त्वचा गोरी करण्यासाठी एका सौदर्य प्रसाधनाची जाहिरात आली. त्यावर तिचा संताप झाला. तिने आम्हाला सांगितले कि; आम्हा लोकांना भारतीय वर्णाचे आकर्षण असते म्हणून आमच्याकडे ह्या कंपन्या त्वचा सावळी करण्याची प्रसाधने विकतात आणि तुम्हाला त्वचा गोरी करणारी प्रसाधने विकली जातात. लोकांच्या असमाधानात वाढ करून आर्थिक विकास साधण्याची हि पद्धत तशी जुनीच.जेव्हा आपण आपल्या राहणीमानाशी असमाधानी होऊ तेव्हाच अश्या उत्पादनांमध्ये आपण आपले समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. असेच काहीसे आर्किटेक्चर मध्ये सुद्धा आहे. नैसर्गिक सामुग्री वापरून बनलेले बांधकाम हे ‘कच्चे’ आणि सिमेंट स्टील तत्सम आधुनिक साहित्य वापरून केलेलं बांधकाम हे ‘पक्के’. मुळात ह्या कच्च्या पक्क्या शब्दांमधेच नैसर्गिक साहित्याविषयी अनास्था दिसून येते. आपल्या सरकारने सुद्धा घरकुल योजनेचा प्रसार करताना ह्या शब्दांचाच वापर प्रामुख्याने केला. मातीची घरे जी. डी. पी. मध्ये सहभागी होत नाहीत. नैसर्गिक साहित्य हे मोफत मिळते किवा देवाणघेवाण, गिफ्ट इकोनोमीने मिळू शकते. म्हणूनच जी. डी. पी. ला साथ न देणाऱ्या सर्व नैसगिक संस्थांचा पद्धतशीर विनाश केला जाऊ लागला. आणि आपले हे प्रगत पारंपारिक ज्ञान मागासलेले झाले. आज आपल्या आर्किटेक्चरच्या शिक्षणत पारंपारिक भारतीय वातुकालेचा वाटा किती आहे ? देशातील वीस हजारांपेक्षा जास्त बांधकामाच्या पद्धती आज आपण केवळ सिमेंट आणि स्टील या दोने साहित्यांनी बदलत आहोत. हे साहित्य निसर्गात पुन्हा विलीन होत नाही. तसेच खोल खाणी खणून जेव्हा हे साहित्य मिळवले जाते तेव्हा निसर्गाची अपरिमित हानी होते जी दिसून येत नाही. एखाद्या गरम वस्तूला हात लागला कि हात चटकन मागे येतो; कारण आपल्याला त्याचा परिणाम लगेच मिळतो. पण निसर्गाची हानी करताना असे होत नाही. त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसून येत नाही. परंतु एका भयानक वास्तवाकडे आपण नकळतपणे वाटचाल केलेली असते.

 

इतिहासात अनेक सभ्यता उदयाला आल्या आणि अस्त पावल्या. हडप्पा मोहनजोदारो हि त्यांची उदाहरणे. अत्यंत प्रगत आणि काळाच्या पुढे असलेला समाज; परंतु त्याहून कितीतरी वर्ष जुनी आदिवासी सभ्यता अजूनही टिकून आहे. ह्याचे कारण; त्यांचा निसर्गाबरोबर असलेला ताळमेळ. कोणत्याही अर्थशाश्त्राशिवाय निसर्गाला देव मानून हा समाज इतर सजीवांप्रमाणे जगत आला. गरजेला त्यांनी कधी लोभात बदलले नाही. म्हणूनच पराकोटीची आत्मिक शांतता आणि समाधान कधी कधी त्यांच्या डोळ्यात दिसून येते. वृक्षवल्ली यांना सोयरे मानणाऱ्या संत तुकारामांचा अभंग इथे आवर्जून आठवतो ‘जैसे ठेविले अनंते| तैश्यापरी राहावे | चित्ती असू द्यावे | समाधान’. काही शतके आधीच तुकारामांना हे वास्तव दिसले होते. आपल्याला आतातरी दिसेल का?