Skip to content

माझ्या गावच्या घराला

माझ्या गावच्या घराला

 

गड्या शेणाचे लिंपण

 

जुन्या कौलातून दिसे

 

खुल्या नभाचे कोंदण

 

 

 

माझ्या गावच्या घराला

 

म्होर लाकडाचे दार

 

अन चिंचेखाली थुजा

 

मातृवात्सल्याचा पार

 

 

 

माझ्या गावच्या घराची

 

सदा उघडी खिडकी

 

त्यातून न्याहाळते ताई

 

चिऊ काऊ ची फुगडी

 

 

 

माझ्या गावच्या घराला

 

लाल मातीचे अंगण

 

जिथे पुनव रातीला

 

पडे पिठूर चांदण

 

 

 

माझ्या गावच्या घराला

 

माग बारकुशी बाग

 

जिथे बसून पिघळे

 

माथी वसलेला राग

 

 

 

माझ्या गावच्या घराला

 

नको पैश्याची श्रीमंती

 

त्यान बांधून ठेवली

 

इथली माती अन नाती

 

 

 

माझ्या गावच्या घरात

 

नेहमी सुखाचा दरवळ

 

तुम्ही येउनी तर बघा

 

इथे स्वागत निर्मळ

 

 

 

………………………………………… हेमपुत्र ( प्रतिक धानमेर )