Skip to content

इको विवाह

– प्रतीक धानमेर

काही दिवसांपूर्वीच शार्दूल आणि अनुराधा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. दोघेही व्यवसायाने आर्किटेक. पण काम करायची पद्धत मात्र निसर्गपुरक. शार्दूलचा हातखंडा मातीची घरे बांधण्यात तर अनुराधा स्थानिक जैव विविधतेला अनुसरून काम करणारी लँडस्केप आर्किटेक. 5 वर्षांपूर्वी दोघे काम करण्यासाठी एकत्र आले आणि नंतर एकत्र विवाहबंधनात अडकले.

पण सरळ धोपट मार्गाने लग्न करतील तर ते कसले शार्दूल आणि अनुराधा …

या अद्वितीय जोडप्याने ‘लग्न’ सुद्धा निसर्गपुरक करायचे ठरवले. लग्न जोरदार आणि थाटामाटात व्हावे अशी दोहोंच्या घरच्यांची इच्छा होती. त्याला जास्त मुरड न घालता दोघांचे प्लांनिंग सुरू झाले.

  1. सुरुवात पत्रिकेपासून झाली. विघटनशील बीज कागदावर नैसर्गिक रंगाच्या शाईने पत्रिका छापण्यात आली. हा कागद कुंडीत पेरल्यास छान रोपे तयार करण्याची योजना. कागद कसा कुंडीत लावावा ही माहिती सुद्धा पत्रिकेवर होती. त्याचप्रमाणे पत्रिकेबरोबर एक कापडी पिशवी. त्या पिशवीत शार्दूल काम करत असलेल्या गावात पिकवलेला लाल महाडी भात. पिशवीवर थोडासा लग्नाचा मजकूर. प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरली जावी हे प्रयोजन.
  2. लग्नासाठी वृक्षाच्छादित छान बगीचा निवडला आणि दिवसा भर उजेडात लग्नाचा कार्यक्रम ठरवला. छान सावलीची जागा आणि पुरेपूर प्रकाश यामुळे अतिरिक्त विजेचा वापर टाळला गेला.
  3. लग्नाच्या संपूर्ण सजावटीचे काम वेती मुरबाड गावातील स्थानिक कलाकारांना देण्यात आले. बांबू आणि माडाच्या झाडाच्या पात्यांच्या सजावटीची लगबग सुरू झाली. गावातील कला लोकांसमोर आणण्यासाठी हा खटाटोप. डिझाइन जत्राच्या विजयालक्ष्मीने सजावटीचे डिझाइन आणि नियोजनाची जबाबदारी दिवस रात्र जागून पूर्ण केली. सर्व बांबू आणि माडाच्या पात्यांच्या फुलांना नैसर्गिक रंगात बुडवून सजावटीची शोभा वाढवण्यात आली. ही सजावट नैसर्गिक असली तरी 5 6 वर्षे टिकणारी आहे. एकदा केलेल्या कामात अजून बरेच समारंभ होऊ शकतात. ही सजावट लग्नाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
  4. लग्नाचे सारे रीती रिवाज अगदी थोडक्यात एका दिवसात आटोपण्यात आले.
  5. लग्नाच्या भेटीगाठीच्या समारंभात मुंबई मधील आरेच्या वन पट्ट्यातील आदिवासी बांधवांकडून चुलीवर केलेले जेवण सुद्धा ठेवण्यात आले. त्या गावठी जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आपल्याच आदिवासी बांधवाना आर्थिक सक्षमता पुरविण्याचा हा किती छान उपक्रम !
  6. आलेल्या वऱ्हाडी मंडळींना परतीची भेटवस्तू म्हणून स्थानिक वृक्षांची रोपे देण्यात आली. आणि ही रोपे लावून जगवून आपले शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन करण्यात आले. शार्दूलच्या अंदाजाने पन्नास एक रोपे उरली तर डहाणूला नेऊन गावच्या जमिनीवर लावावी असे ठरले, पण वऱ्हाडी मंडळी हा हा म्हणता सारी रोपे आनंदाने घेऊन गेले.
  7. संपूर्ण लग्नात प्लास्टिक चा वापर शून्य, एवढंच काय तर इको हब तर्फे प्लास्टिक नियोजनाचा स्टॉल अगदी लग्न मंडपाच्या दाराशीच लावण्यात आला. आणि आलेल्या पाहुण्यांना प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन कसे करावे यावर संक्षिप्त माहिती देण्यात आली.

एकंदरच असा एक संस्मरणीय इको विवाह आम्हाला याची देही याची डोळा अनुभवता आला. दोन निसर्गावर प्रेम करणारी माणसे प्रेमात पडल्यावर काय होते त्याचे हे लग्न म्हणजे उत्तम उदाहरण. त्या भर लग्नमंडपात निसर्गसुद्धा शार्दूल अनुराधाला सावलीच्या रूपाने भरभरून आशीर्वाद देत होता. ह्या इको जोडप्याला विवाहप्रीत्यर्थ खूप खूप शुभेच्छा !!!