Skip to content

मातीची कला आणि किमया ..

मातीची कला आणि किमया ..

शिळोशीचे अमित चव्हाण यांचे घर …..

By Ar. Pratik Dhanmer.

एका लहान गावात एक छान टुमदार कौलारू घर असावे. घरासमोर अंगण असावे, बाग असावी. शेणाचे सारवण, लाकडी माळा आणि मातीचे लिंपण असलेल्या भिंती असाव्यात अशी प्रत्येक शहरी माणसाची इच्छा असते. आणि येणाऱ्या भावी पिढीला याचे दर्शन तरी होईल का? अशी सर्वांचीच खंत आहे. पण त्यावर कृती म्हणावी तशी होत नाही.

व्यवसायाने वकील असलेल्या परंतु निसर्ग आणि जैव विविधतेत प्रचंड रस असलेल्या श्री. अमित चव्हाण आणि त्यांच्या पत्नी जुईली यांनी आपल्या मुलांना ह्या सांस्कृतिक वैभवाची ओळख व्हावी म्हणून ठोस पावले उचलली. रोहा जवळील शिळोशी गावात एक लहान शेतजमिनीवर त्यांनी पाचशे चौरस फुटाचे चिखल मातीचे घर बांधले. घर जास्त मोठे नसावे पण निसर्गात विलीन होणारे असावे. उजेड पुरेपूर असावा. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा आणि स्थानिक नैसर्गिक साहित्याने ते बांधले जावे अशी ऍड. अमित यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून देण्याची जबाबदारी पालघर तालुक्यातील ‘डिझाइन जत्रा’ च्या वास्तुविशारदांनी घेतली.

दगडी पायावर चिखल आणि गवताच्या जाडजुड भिंती. त्या भिंतीमध्येच कोनाडे करून सर्व समान ठेवण्याची व्यवस्था. सदर भिंती बांधताना अमित चव्हाण, त्यांच्या पत्नी, 13 वर्षाचा मुलगा दिप्तांशु आणि 9 वर्षाची मुलगी सानवी हे सारे जण गावातील गावातील कारागिरांबरोबर स्वतःच्या हाताने चिखल कालवून बांधकामात सहभागी झाले. भिंतीला असेलेले नक्षीकाम पाहून तुम्हाला त्यांच घराशी असलेल नातं लक्षात येईल. लाकडी खांबांच्या मध्ये आणि मातीच्या भिंतींवर बांबूच्या कुडाच्या भिंती. त्याला माती, चुना, भाताचे तूस, शेण, रांगोळी ह्यांचे नैसर्गिक प्लास्टर. ह्या प्लास्टरमुळे भिंती सच्छिद्र राहून घरातील तापमान नियंत्रित होते. लाकडी खांबांवर ऐनाच्या लाकडाचे कौलारू छप्पर . शंभर चौरस फुटाचा पोटमाळ. त्याला छपरातून निघणाऱ्या दोन खिडक्या; ज्यातून रात्री झोपताना छान आकाश दर्शन होते. पूर्वेची खिडकी सकाळचे सोनेरी ऊन संपूर्ण घरात पसरवते. मातीच्या जमिनीला शेणाचे सारवण. मुलांनी कितीही उड्या मारल्या तरी चिंता नाही. मुळातच हे घर मातीच्या गुणधर्मांची योग्यता अधोरेखित करते. नैसर्गिक घराचा आपल्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम, अनावश्यक खर्च टाळून योग्य खर्चात होणारे बांधकाम आणि त्याचे आजूबाजूच्या वातावरणाला साधले जाणारे अनुकूलन ह्या घराच्या जमेच्या बाजू.

हे घर आपल्या पारंपरिक बांधकामाच्या शैलीला आताच्या आधुनिक गरजांशी जोडते. पारंपरिक बांधकाम साहित्याची डागडुजी (मेंटेनन्स)  कमी करून हे घर विजेची उपकरणे, कन्सिल इलेक्ट्रिक फिटिंग अश्या आधुनिक गरजांशी योग्य मेळ साधते.

अर्थातच स्नानगृह आणि शौचालय ह्यासाठी पारंपरिक बांधकामाला मर्यादा येत असल्याने ह्या दोन्ही सोयी घरापासून वेगळे ठेवण्याचा निर्णय ऍड. अमित यांनी घेतला.

अश्या प्रकारचे घर बांधत असताना नैसर्गिक साहित्याचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊनच पावले उचलावीत. मातीच्या घरात राहण्यासाठी त्यायोग्य पर्यावरण पूरक जीवनशैली सुद्धा हवी. मातीच्या घरांकडून आधुनिक घरांप्रमाणे अपेक्षा ठेवण्यापेक्षा ऍड. अमित यांनीआणि त्यांच्या कुटुंबाने या घरासाठी स्वतःच्या राहणीमानात योग्य ते बदल करून ह्या घराची शाश्वतता सिद्ध केली. हे घर म्हणजे नैसर्गिक परिसर, नैसर्गिक साहित्य, क्लायंटच्या निसर्गपुरक संकल्पना आणि निसर्गाकडे कल असलेले वास्तुविशारद या सर्वांच्या सहभागातून तयार झालेली एक कलाकृती आहे.

एकंदर ऍड. अमित यांच्या विचारातील घराने हवा तसा आकार घेतला.  घराबद्दल बोलत असताना एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येते.

सदर घराची छायाचित्रे खाली जोडलेली आहेत, तुम्ही सुद्धा ठरवा तुमच्या स्वप्नातील घर नक्की कसे आहे ते ….