Skip to content

शिक्षण आणि संवेदनशीलता

प्रतीक हेमंत हेमलता धानमेर 

नैसर्गिक साहित्याने घर बांधायचे प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्याकडे सतत वास्तुकला (architecture) महाविद्यालयातून मुले येत असतात. साधारण 30 – 30 विद्यार्थ्यांचे समूह 5 ते 7 दिवस माझ्या गावात राहून स्वतःच्या हातांनी काम करून मातीचे आणि बांबू चे बांधकाम शिकतात. मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई आणि अजून काही लहान शहरातील महाविद्यालये यात सहभागी होतात.

बऱ्याचदा ह्या मुलांबरोबर काम करत असताना त्यांच्यात ‘संवेदनशीलतेचा’ अभाव दिसून येतो. ह्यात त्या मुलांची किंवा पालकांची किंवा समाजाची किती चूक हा विषय बाजूला ठेवू, पण वास्तुकला सारख्या एका महत्वाच्या व्यावसायिक क्षेत्रात उपजत संवेदशीलता नसणे हे थोडे भीतीदायक वाटते. कदाचित मी फक्त या एका क्षेत्रात कार्यरत असल्याने मी ह्या क्षेत्रातील शिक्षणाबद्दल बोलेन.

जेव्हा जेव्हा ही मुले माझ्या घरी येतात तेव्हा त्यांना एकमेकांबरोबर राहावे लावते. घर तितकेसे मोठे नसल्याने बऱ्याचदा त्यांना आपल्या मित्रांबरोबर adjust करावे लागते. हे करत असताना त्यांच्यात असलेले ग्रुप स्पष्ट दिसून येतात. बऱ्याचदा हे गट त्यांच्या आर्थिक परिस्थिशी संबंधित असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुंबई सारख्या शहरातून येणारे बहुतांश विद्यार्थी हे सुखवस्तू कुटुंबातून येतात. ते त्यांच्या राहाणीमानवरून दिसून येते. आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणारे विद्यार्थी मात्र जर अलिप्तच राहताना दिसून येतात.

दिवसभर शेणमातीत काम केल्यावर मुलांना घरचे उत्तम सकस अन्न मिळायला हवे यासाठी माझे आई बाबा आणि घरातील इतर काही जण  स्वतःच्या हातानी जेवण बनवतात. बऱ्याचदा जेवणात गोडाधोडाच असावं म्हणून गुलाबजाम, खीर असे पदार्थ आम्ही हमखास करतो. सारे जेवण पडवीत ठेवल्यावर एक एक विद्यार्थी आपल्या हातानी स्वतःला वाढून घेतो( बुफे सिस्टिम ). अश्यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना, नंतर मिळणार नाही म्हणून जास्तीचे गुलाबजाम, पापड घेताना मी नेहमीच पाहतो. अश्यावेळी कित्येकदा शेवटी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण अपुरे पडते आणि आधी जेवण घेतलेले विद्यार्थी पोट भरले म्हणून उरलेले जेवण निःसंकोचपणे फेकून देतात. हेच विद्यार्थी sustainable architecture बद्दल सांगताना आपण पुढील पिढी साठी कसे नैसर्गिक संसाधने जपून वापरायला हवीत ह्यावर भरपूर बोलतात. गावात प्लास्टिकमुळे खूप अडचणी होत आहेत आहेत हे कित्येकदा समजावून सुद्धा खाऊ खाऊन झाल्यावर वेष्टण इथे तिथे सहज फेकले जाते.

मागच्या महिन्यात एका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग मधील धामापूरला अभ्यास भेटीसाठी घेऊन जाण्याचा योग्य आला. तिथे जात असतानाच बस मध्ये एका मुलीला ताप भरला. नशिबाने धामापूर मधील सचिन दादा तिथेच असल्याने ते मदतीला धावून आले. 5 दिवसाच्या त्या दौऱ्यात ती मुलगी त्यांच्याच घरी राहिली. मी रोज संध्याकाळी सचिन दादांकडे जाऊन चौकशी करत होतो. शेवटच्या दिवशी ती मुलगी छान बरी झाली. त्यावेळी सचिन दादांनी एक प्रश्न मला विचारला -” प्रतीक तिला कोणी मित्र मैत्रिणी नाही आहेत का तिच्या वर्गात ?” . मी म्हंटल “आहेत की !”

त्यावेळी सचिन दादांनी मला अंतर्मुख करणारे भाष्य केले- जर तिला मैत्रिणी आहेत तर कोणतीच मैत्रीण तिला पाहण्यासाठी घरी का आली नाही ? त्यांनी तुला विचारलं तरी का की आपली मैत्रीण कशी आहे ? तिची तब्येत कशी आहे?. आपल्या आजकालच्या मुलांमध्ये इतकीसुद्धा करुणा उरली नाही का रे ? इतकं उच्च शिक्षण घेताना ही संवेदशीलता कुठे हरवत चालली आहे ? मी गप्प झालो. ह्याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. हे मुलांना कस कुठे कधी शिकवायचं हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण ह्या साऱ्याच घटनांनी मी प्रचंड व्यथित झालो होतो.

काही दिवसांपूर्वीच सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या 27 विद्यार्थ्यांचा गट त्यांच्या शिक्षकांसोबत आमच्या गावी आला. ह्या गटातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून होते. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची वाटत होती. काम करताना हे विद्यार्थी मन लावून काम करत होते. मी त्यांच्या कामावर खुश होतो. ह्या मुलांना घेऊन मी दुसऱ्या दिवशी एका गावात settlement study साठी गेलो. पोहोचता पोहोचता रात्र झाली. पोटात भुकेने थैमान घातले होते. गावातल्या महिला बचत गटाने छान जेवण बनवले आणि जेवणाचे टोप आमच्या समोर ठेवून दिले. आता सारी मुले जेवणावर तुटून पडणार आणि जेवणाचा फडशा पडणार असे वाटले. पण  6 7 विद्यार्थी उठले आणि त्यांनी सगळ्यांना बसायला सांगितले. एकेकाला पत्रावळी वाटून त्यांनी जेवण वाढायला सुरुवात केली. गावी पंगत बसते अगदी तशीच. आग्रह करून एकमेकांना वाढत होती. बसच्या ड्रायव्हरला सुद्धा वाढायला विसरली नाहीत. ( इतर वेळी आपल्या बरोबर बस चा ड्राइवर आहे ह्याचा विसरच पडतो विद्यार्थ्यांना). हास्यविनोद करत जेवण चालू होते. पत्रावळ्या कमीच होत्या आणि 3 दिवस पुरणार नाहीत हा अंदाज त्या विद्यार्थ्यांना आला. त्यामुळे एका एका पत्रावळीत दोन तीन विद्यार्थी जेवण जेवू लागले.  एक पंगत उठल्यावर जेवण झालेल्या विद्यार्थ्यांनी उरलेल्या विद्यार्थ्यांना जेवण वाढायची जबाबदारी घेतली. हे अगदी लीलया घडलं. त्याचे विद्यार्थ्यांना काहीच कौतुक नव्हते, किंबहूना हे जे ते वागले ते काही वेगळे आहे हे कदाचित त्यांना माहीत सुद्धा नव्हते. पुढचे सलग 2 दिवस हे प्रत्येक जेवणाला घडले. मुलांकडून धडा घेतलेल्या आम्ही शिक्षकांनी सुद्धा मग एक दिवस वाढायची जबाबदारी घेतली. तीन दिवस कोणतीही कटकट न करता आनंदाने जे मिळेल त्यात विद्यार्थ्यांनी भागवल. शेवटच्या दिवशी गावात मिळेल त्या फुला-पानाचे गुच्छ बनवून अन्नदात्यांचे त्यांनी आभार मानले. आटणाऱ्या संवेदनशीलतेला अचानक नवसंजीवनी मिळल्यागत वाटले. शाश्वत वास्तुकला ( sustainable architecture ) शिकवताना हरवलेला संवेदनशीलतेचा पाया या मुलांमध्ये पुन्हा मजबूत आढळून आला आणि समाधान वाटले.