Skip to content

Architecture म्हणजे नक्की काय रे भाऊ?

Architecture म्हणजे नक्की काय रे भाऊ

Ar. प्रतीक धानमेर.

मागे एका आदिवासी गावात एका प्रकल्पासाठी जाण्याचा योग आला. त्या गावात फिरता फिरता लहान मुलांच्या एका घोळक्याने माझं लक्ष वेधून घेतलं. त्या घोळक्यातील प्रत्येक मुलाने स्वतःचे खेळणे स्वतः बनवले होते. सलग एक तार वापरून बनवलेली गाडी पाहून मी सुन्न झालो. केवळ 5 वर्ष वयाच्या ह्या मुलांनी हे कसब आणले कोठून? .. कुठून शिकले ते ही कला?

सागाची कोवळी पाने हातावर चोळली की लाल रंग येतो इतकी एकच जादू मला माहित होती, आणि या एका माहितीच्या जोरावर न जाणे मी किती उडया मारल्या. पळसुंडा गावात गेल्यावर कळलं की ही सागाची पाने वापरून घोडा बनवता येतो… आणि लहान लहान मुले शाळेतून येताना घोडा घोडा खेळत येतात. पण सागाच्या ह्या दोन कोवळ्या पानात लपलेला घोडा काही माझ्या वास्तुविशारद डोळ्याना दिसेना… मग आमच्याबरोबरच्या जगन्नाथ दादांनी काही सेकंदात त्या दोन पानांना आकार देत ही अगम्य पण सोपी कलाकृती साकारली. डोकं चक्रावून गेलं.. त्या सोप्या कलेची खोली पार बुद्धीला छेद देत आरपार गेली… design, फॉर्म , डिटेल्स हे सगळं शब्दापुरत मर्यादित राहून ह्या कलेचं अध्यात्म उमगु लागलं.. इतकं सोपं असत का हे सगळं? … इतक सोप्प की लहान मुलांना ह्या दोन पानांमध्ये लपलेलं रहस्य सहज दिसावं ???

ह्याच आदिवासी गावात काठ्याकुट्या वापरून कंपाउंड बनवले जाते. ज्याला स्थानिक भाषेत ‘वय’ म्हणतात. ही वय दोन तीन वर्षात सडून जाते. मग ह्या वयीची लाकडं जळण म्हणून वापरली जातात. ह्या जळणाची राख भांडी घासायला आणि दात घासायला वापरली जाते. कधी कधी अंघोळीला सुद्धा. मग हेच पाणी घरामागच्या परसबागेत सोडले जाते. ह्या राखेतील पोटॅशिअम झाडांना मिळते. पुन्हा त्याच झाडाच्या काट्या कुट्या वापरून वय बनवली जाते. हे सारं इतकं सोपं कसं?

माझ्या गावातील एका गृहस्थांकडे 40 बकऱ्या आहेत. ईद आली की तो सर्व बकऱ्या विकतो. त्याच्या घरच्या भिंती कुडाच्या आहेत( कुड म्हणजे लांब बारीक काठ्या आणि त्यावर शेणाचे लिंपण). खूप बकऱ्या असल्या की तो ती भिंत काढतो आणि घर वाढवतो. बकऱ्या विकल्या की इतकी मोठी जागा काय करायची? मग तो पुन्हा भिंत काढून घर लहान करतो. घर हवे तसे लहान मोठे करायची ही संकल्पना त्याला कोणत्या आर्किटेक ने शिकवली ?

हीच भिंत काही वर्षांनी खराब झाली की ती शेतात फेकून देतात. कुडाचं आणि शेणाचे विघटन होऊन मस्त खत तयार होत आणि जमीन सुपीक होते. हे निसर्ग चक्राचे नियम ही अशिक्षित माणसे इतक्या सहजपणे कसे काय आत्मसात करतात? आपण सुशिक्षित आणि प्रगत माणसे हे का समजू शकत नाहीत?

वरील साऱ्या घटना ह्या गरजेतून निर्माण झाल्या आहेत. एखाद्या गोष्टीची खोल गरज भासली की त्यातून मार्ग आपोआप निघतो. गरज शोधाची जननी आहे हे खरे पण गरज आणि लोभ यातील सूक्ष्म परिसीमा आपण केव्हाच ओलांडली.

एक आर्किटेक म्हणून जेव्हा भारतभर फिरण्याचा योग आला तेव्हा कळलं; खरे शिक्षण अजून बाकी आहे आणि विनाभिंतींची ही शाळा जागेजागी आहे. अजूनही भारतात 50% पेक्षा जास्त घरे पारंपरिक पद्धतीने बांधली जातात. ही घरे सभोवतालच्या परिसराशी एक संयत तोल साधतात. जेव्हा जवळपास असलेल्या साहित्याने घर बांधले जाते तेव्हा तिथल्या स्थानिक वातावरणाशी ते अनुकूल राहते. घर थंड किंवा गरम ठेवण्यासाठी कोणत्याही मानवनिर्मित ऊर्जेची गरज भासत नाही. हे नैसर्गिक साहित्य तेथील हवामानाला उत्तम प्रतिसाद देते. वाहतुकीचा खर्च कमी होतो. स्थानिक कौशल्य वापरल्याने गावातील पैसा गावातच राहतो आणि अर्थव्यवस्था केंद्रित न होता विभागली जाते. एकूण घर बांधण्याचा खर्च प्रचंड कमी होतो आणि affordable housing हा शब्द अंधश्रद्धा न राहता प्रत्यक्षात उतरतो. म्हणूनच कदाचित गांधीजींनी लौरी बेकर यांना दिलेला हा कानमंत्र आज एक विलक्षण वास्तूरचनेची साक्ष देत आहे.

मेळघाट येथील अभयारण्यात एक गाव आहे सेमाडोहा नावाचे. ह्या गावातील सर्व घरे एक योजनाबद्ध town planning चा उत्तम नमुना आहे. सर्व घरे कुडाची आणि मातीच्या भिंतींची आहेत. सर्व घरांचा व्हरांडा सलग आणि एकमेकांना जोडलेला. ह्या गावात जर एखादा वाघ चुकून घुसलाच तर सलग सरळ रस्त्यांवरून तो सहज दिसतो. मग फक्त एक आरोळी ठोकायची ” वाघ आला रे आला !” की सर्व घरांचे दरवाजे खडा खड बंद होतात. एक वास्तुविशारद म्हणून मी हा विचार ह्या गावचे planning करताना कधीच केला नसता. ह्या गावात एक परंपरा आहे. दरवर्षी दिवाळीच्या अगोदर घरातील लोक जंगलात जाऊन नैसर्गिक रंगाची फुले फळे आणतात आणि चुन्यात टाकून रंग बनवतात. गावातील सर्व घरांना तो एकच रंग लावला जातो. उच्च नीच, जातीयता, लहानमोठा हा भेद बाजूला करण्याचा ह्यापेक्षा दुसरा उपाय तो कोणता ? पण गावातील एखाद्या व्यक्तीने जर काही गुन्हा केला किंवा चोरी केली तर फक्त त्या एकाच घराला रंग लावला जात नाही आणि ते एक घर वेगळे पडले जाते. बापरे! एखाद्या समाजाने गावातील गुन्हे कमी करण्यासाठी शोधलेली ही किती सुंदर पद्धत . ह्या परंपरेचा प्रचंड दबाव गुन्हेगाराला दुष्ट प्रवृत्तीपासून दूर करतो. Architecture मुळे अश्याप्रकारे समाजात प्रभाव निर्माण होणे मी पहिल्यांदाच पाहिले. ह्या परंपरेमुळे त्या गावातील कोणीही व्यक्ती वेगळे साहित्य वापरून घरे बांधत नाही. कारण घर वेगळे दिसले तर तो गुन्हेगार ठरेल. ह्या परंपरेचा आदर करावा तितका कमी!

माझ्या स्वतःच्या गावात काम करताना आम्हाला कळले की केवळ architecture ने सर्व अडचणी कश्या दूर होणार? आपल्याकडे हातोडा आहे म्हणून सर्वच खिळे अडचणी आहेत असे होत नाही. जसे हातोडा हा अवजार आहे आणि तो एका विशिष्ट कामासाठी वापरला जातो तसच architecture एक अवजार आहे आणि त्याने आपण एक विशिष्ठ अडचणच दूर करू शकतो. पण प्राधान्यक्रमात ही अडचण 9व्या 10व्या क्रमांकावर होती हे कळल्यावर आम्ही त्याचा अट्टाहास सोडून पहिल्या अडचणींवर लक्ष केंद्रित केले. आम्ही सामूहिक शेती सुरू केली. ह्यालाच मी म्हणेन गरजेला प्रतिसाद. गरज निर्माण करून त्याला प्रतिसाद निर्माण करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. मग गरज ‘गरज’ न राहता लोभ बनते. आधी घरे बांधून नंतर विकणे हे त्याचेच उदाहरण. जेव्हा आपण architecture व्यवसायाकडे या नजरेने पाहू तेव्हाच आपल्याला त्याची खोली आणि गोडी उमगु लागते.

खरंतर आजच्या शिक्षण पद्धतीत विषय वेगवेगळे करण्याचे कसब आपल्यात का पेरलं जातंय हे मला खरच कळत नाही. कोणत्याही विषयाची खोली त्याला जोडून येणाऱ्या अनेक विषयांनी वाढते. एक आर्किटेक म्हणून आपण फक्त घरे बंधू शकत नाहीत किंवा फक्त बांधकाम करू शकत नाहीत. हे सारे करताना आपण निसर्ग चक्रावर भार टाकत असतो. असंख्य संस्था त्यात जोडल्या जातात आणि आपल्या ‘काहीतरी वेगळं’ बनवण्याच्या सुक्या अहंकाराला तृप्त करण्यासाठी कोणीतरी आपले जीवनही गमावत असतो. ह्या साऱ्या रचना फार गुंतागुंतीच्या आहेत पण त्या सोप्या दाखवण्याचे विलक्षण खोटे कौशल्य आपल्या केंद्रित अर्थव्यवस्थेत आहे. केवळ औद्योगिक जगात निर्माण होणारे साहित्य वापरून आणि एकच ढाच्याची घरे बांधून आपण ह्या लहान स्वयंपूर्ण संस्था आणि स्थानिक घरांची ओळख सारेच मिटवून टाकत आहोत.

एक वास्तुविशारद म्हणून आपण केवळ बांधकामाशी संलग्न बुद्धीच्या कक्षा रुंदावून त्याच्या परिणामांची खोली मोजायला हवी. उदाहरण म्हणजे निदान आपण बांधकामाचे वापरात असलेले साहित्य कोठून आणि कसे येते हे जरी तपासून पाहिले तरी खुप झाले. सिमेंट कसे बनते? रेती कुठून आणि कशी येते? आपल्या नळाला पाणी कसे येते ? जेव्हा ह्या एकेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात तेव्हा बुद्धीची संवेदनशीलता इतकी वाढते की जाणवू लागते – बांधकाम न करणेही कधी कधी architecture असू शकते.

मधोमध आग लावून जेव्हा आदिवासी फेर धरून नाचतात तेव्हा तात्पुरता का होईना पण एक space तयार होतो. ह्या रिंगणात प्रचंड ऊर्जा असते. आणि हा space बांधला जात नाही, तो घडतो. आपण भारतीय विद्यार्थ्यांनी ह्या सर्व रचनेकडे डोळसपणे पाहायला हवे. “आपल्या भारतात सांस्कृतिक ज्ञान किती छान!” ह्या कोत्या कौतुकापलीकडे जाऊन त्याची खोली  अभ्यासली की ते ज्ञान अध्यात्म होऊन पवित्र होते आणि त्याची संवेदनशीलता फक्त उत्तम आणि चांगल्या गोष्टींचीच निर्मिती करते.

वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा ज्ञानेश्वर लिहितात ‘ जो जे वांच्छिल तो ते लाहो’ .. तेच हे अध्यात्म आणि संवेदनशीलता ..  आपण सर्वात ही संवेदनशीलता लपून असते. फक्त बुद्धीचे हे स्तर खोदून ती शोधावी लागते.

तेव्हाच कळते … त्या मुलांनी बनवलेली गाडी, सागाच्या पानात लपलेला घोडा, घराची वय आणि बकरी वाल्याच्या घराची भिंत सारेच काही Architecture आहे.